fbpx

गुरु आणि शिष्य

गुरु आणि शिष्य ही नावे झाली. ती रुपे नव्हेत.


“गुरु आणि शिष्य ही नावे झाली. ती रुपे नव्हेत.” – श्री निसर्गदत्त महाराज

आपल्यासाठी आपण काय आहोत ह्या मान्यतेवरच आपण इतर कोणालाही ओळखू शकतो. जणू आपल्याला असलेली आपली ओळख हा आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीला/वस्तूला ओळखण्यासाठी एक प्रकारचा चश्मा म्हणून काम करतो. ज्याने स्वतःला ओळखले तो दुसर्‍या कोणालाही ओळख विचारायला जात नाही, ओळखायला जात नाही, त्याची गरजच मुळी उरत नाही. जोपर्यंत शिष्य स्वतःला देह-रुप समजतो तोपर्यंत स्वाभाविकपणे त्याला गुरुदेखील देहधारी व्यक्ती असेच दिसतो. जोपर्यंत शिष्याच्या ठायी ‘वेगळेपणाचा भास आहे, विश्वास आहे तोपर्यंतच गुरु वेगळा म्हणून उपस्थित आहे. ज्या क्षणी शिष्यामधील वेगळेपणाचा भास गळून पडतो तत्क्षणात गुरु आणि शिष्य हि फक्त नावे होती, फक्त संज्ञा होत्या हे स्पष्ट उलगडले जाते. शिष्याचा वेगळेपणाचा भास गळून पडण्याचाच अवकाश असतो कारण गुरुसाठी स्वतःचे वेगळेपण केव्हाच लयाला गेलेले असते. जोपर्यंत दुसर्‍याची गणती आहे फक्त तोपर्यंतच एकाला स्थान आहे. दुसरा गळून पडताच उरलेल्याने कशाची गणती करावी आणि का बरं गणती करावी? म्हणूनच तर ह्या उरलेल्या भरपूर अनुपस्थितीला ‘एक’ न म्हणता, अद्वैत (दोन नाही असां) म्हटले गेले आहे. गुरु-शिष्याच्या ह्या पूर्वपक्षातील खेळाला “मॅड” गेम (मास्टर ऍन्ड डिसाइपल) असे पण म्हणता येईल. ‘शिष्य’ जोपर्यंत शिष्य भूमिकेमध्ये असतो तोपर्यंतच गुरु, गुरुची भूमिका खेळतो. बांस इतकेच. 🙂

जय गुरु _()_

-नितीन राम

Top