fbpx

नाहीतून आहे आणि आहेतून नाही

‘जाणीव’ कशी निर्माण झाली?

रामकृष्णः ‘जाणीव’ कशी निर्माण झाली ह्याबद्दल आपण काही प्रकाश टाकू शकता का?

नितीनः मला काहीच ‘माहिती’ नाही…….!                   
श्री निसर्गदत्त महाराजांच्या शेवटच्या तीन पुस्तकांमध्ये ह्याबद्दल ‘माहिती’ मिळू शकते अन्यथा पुरातन ग्रंथ बरेच असू शकतात.

माझे लक्ष कोठे असायचे ते मी तुम्हाला सांगू शकतो. मला पडणारे प्रश्न काय असायचे ते मी तुम्हाला सांगू शकतो. “प्रश्न विचारणारा कोण! प्रश्नाचे उत्तर कोणाला पाहिजे आहे! ह्या प्रश्नाचे उत्तर मिळून पण ‘प्रश्नहिन’ अशी कायम अवस्था उघडी होणार आहे का?”

 एक प्रश्न संपला कि दुसरा उपस्थित होतो, दुसरा संपला कि तिसरा अशी ही अनंत प्रश्न-दशा आहे. प्रश्नांची उत्तरे मिळून बुद्धीला समाधान मिळते पण तेही क्षणिकच ना!!! ‘जाणीव’ अशी-अशी निर्माण झाली किंवा तशी-तशी निर्माण झाली हे कळून खरच काही उपयोग आहे का !! कोठल्याही प्रकारच्या उत्तराने कायम-स्वरुपी समाधान मिळणार आहे का!! ह्यापूर्वीच्या आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळून देखील नव-नवीन प्रश्न पडणे चालूच आहे ना!!! मग रोज-रोज नुसता ‘प्रश्न-उत्तर’ हा खेळच खेळत बसायचे कि काय !!!

 नुसत्या उत्तराने कधीच परिणाम येत नाही आणि येणार पण नाही. प्रश्न आणि उत्तर हा फक्त शब्दांचा खेळ झाला किंवा फार तर बौद्धीक उपक्रम. प्रश्नकर्त्याची जो पर्यंत उत्तरदेणार्यावर श्रद्धा असत नाही, विश्वास असत नाही तोपर्यंत मिळालेल्या उत्तराबाबत ‘विवेक’ होणे केवळ अशक्य! अन्यथा गीतेची, योगवासिष्ट्याची पठणे काय कमी माणसे करतात का ? पण श्रीराम, अर्जुन, ज्ञानेश्वर, जनक, निसर्गदत्त किंवा काही मोजकेच का बरे ‘प्रश्नहिन’ होवू शकतात!!! श्री निसर्गदत्त महाराजांना काय कमी माणसे भेटली? त्यांची पुस्तके काय कमीजण वाचतात का? बौद्धीक हालचाली पलिकडे काहीतरी आहे ह्यावर श्रद्धा असणारा मात्र दुर्मिळच आणि श्रद्धेवर श्रद्धा असणारा तर अजुनच दुर्मिळ! असो…

 बोधाचे मूळ विवेकात आहे… विवेकाचे मूळ श्रद्धेत आहे नि श्रद्धेचे मूळ प्रेमात आणि प्रेम हा तर आपला मूळ स्वभाव आहे जो सहज, स्वयंस्फूर्त नि अकारण आहे.

 मग ‘कायम’ असे जे समाधान आहे त्याची चौकशी झाली, त्याचा अध्यास झाला तर तेच ‘कायम-समाधान’ तत्काळ उघड होते. आपल्यामधील हा ‘अज्ञात प्रश्नकर्ता’ आहे तरी कोण*, ह्याचा ध्यास लागला तर प्रश्नकर्त्यातून कायमची सुटका होउ शकते हे निश्चित! पण ह्या मूळ प्रश्नाकडे* आत्ता जर लक्ष द्यायचे नसेल तर उरलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अनेक ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये मिळू शकतात. पण ह्या मूळ प्रश्नाचे उत्तर कायमच आपल्याला आपल्यातच मिळते हे नक्की! बाकी भेटी अंती…..

सप्रेम नमस्कार आणि आभार!
जय गुरु

-नितीन राम
२७ मे २०१
http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer

Top