fbpx

हरवलेल्याला येते शोधता पण विसरलेल्याचा कसला शोध

सप्रेम आठवण

विसरलास रे तू विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

शब्दांमध्ये गुंतलास आणि निशब्दालाच विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

धावण्याकडेच लक्ष तुझे, मूळ ‘मुक्काम’ मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

चित्रांमध्ये रमलास आणि रिकामा कॅनव्हास मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

शब्द-अर्थाकडे लक्ष तुझे पण स्वार्थ (स्व-अर्थ) मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

शिक्षणात बुडून गेलास पण ह्या क्षणाला मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप`तू …फक्त विसरलास!

धारणांची रमी खेळताना हुकुमाचा राम मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

जिंकण्याच्या खेळामध्ये हारण्याची मौज घ्यायला विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

योग इत्यादि कार्यक्रमात, ‘न झालेल्या’ वियोगालाच विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू … फक्त विसरलास!

अनुभवांमध्ये रमता रमता, अनुभोक्त्याला मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

किनार्यां्वर खेळाच्या नादात, प्रवाहालाच विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

सुखांमागे धावता धावता, आत्मसुख तू …फक्त विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू … फक्त विसरलास!

कार्यकारणात गुंतलास आणि ‘अकारण अस्तित्व’ मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

जे ‘क्षणिक’ त्याची साठवण आणि जे ‘कायम’ त्याची नाहि आठवण,
विसरलास रे तू विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

सप्रेम आठवण!

-नितीन राम
०९ ऑक्टोबर २०१०
www.abideinself.blogspot.com

Being is ‘ease’ and becoming … a Dis’ease’.
Top