#Shree Nisargadatta… आत्मश्रद्धा
श्रद्धा हरवली आहे का हो…!

![]() |
श्रद्धा हरवली आहे का हो…! |
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
जेमे-तेम दोन-तीन वर्षांची भोळी श्रद्धा! कायम तर घरीच असायची!
आहे-नाहीच्या भानात पण नसायची! अचानक कोठे गेली ही श्रद्धा!!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
कदाचित कल्पनेच्या पंखावर बसून भरकटली असावी;
शब्दांच्या बाजारात न कळतच अडकलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
नकळत संशयाची उसनी चप्पल घालून गेली असावी;
मुक्तीच्या शोधात कोठेतरी अडखळलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
कोणी म्हणते स्वतःचे घर शोधायला गेली असावी;
कोणी म्हणते कुलुपाची किल्ली शोधायला गेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
काही म्हणतात शांतीला शोधायला गेली असावी;
काही म्हणतात आनंदाला शोधायला गेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
कोणी सांगतात ज्ञानार्जन करायला गेली असावी;
कोणी म्हणतात योगाभ्यासात गुरफटली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
कोणी म्हणते तिला विचारांची विषबाधा झालेली असावी;
कोणी म्हणते भ्रमाच्या भोवर्यात अडकलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
कोणी म्हणतात एकटेपणाला वैतागलेली असावी;
कोणी म्हणतात स्वतःपासून दूर पळाली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
आता जवळपास पन्नास साठ सत्तर वर्षे झाली कि हो….
काय माहीत निरागस श्रद्धा कोठे कोठे फिरते आहे अजून!!
काय माहित का स्वतःपासून लांब लांब पळते आहे अजून!!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!!
कदाचित एव्हाना आपला निरागसपणा हरवून बसलेली असावी;
कोणी सांगावे कदाचित बुद्धीच्या अलंकारांनीही मढलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो…! आत्ता तर इथेच होती…!!! 🙂
ऐका…अहो…ऐका!!! ही पहा श्रद्धा इथेच तर आहे की…!!
अहो श्रद्धेला आत्ताच “जाग” आली! श्रद्धा जागच्या जागीच “जागी” झाली हो..!!
श्रद्धा… स्वगृहातच जागी झाली…!! श्रद्धेला पडले होते स्वप्न; अहो जागेपणातले स्वप्न..!! श्रद्धा कोठे गेलीच नाही आणि आलीही नाही!! स्वप्नातलेच ते हरवणे आणि स्वप्नातलाच तो “शोध”…!! आता मात्र श्रद्धा श्रद्धेलाच भेटली….खरीखुरी..!! श्रद्धा स्वतःलाच भेटली…कायमचीच! …………आपलीच भेट आपणासी…!!! आता कोठ्ले जाणे आणि येणे…!!!
सप्रेम…….
जय गुरु
-नितीन राम
२६ मे २०११
http://www.abideinself.blogspot.com/
Any visitor, who would like to translate this Marathi post in English are most welcome.