#अनंत अथांग तूच रे
तूच रे… तूच रे …

![]() |
Picture Courtesy: Shaantanu Kulkarni |
असण्याच्या अलिकडे… नसण्याच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
जीवनाच्या पडद्यावर…
तूच रे… तूच रे !
आरश्याच्या अलिकडे… आरश्याच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
क्षणिक प्रतिबिंबात…
तूच रे… तूच रे !
आकाशाच्या अलिकडे… आकाशाच्या पलिकडे
आणि दोन्ही मधल्या
नभ-रुपी देखाव्यात…
तूच रे… तूच रे !
पाटीच्या अलिकडे… पाटीच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
रंगीत रेघोट्यांत…
तूच रे … तूच रे !
वातीच्या अलिकडे… वातीच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
निर्मल प्रकाशात…
तूच रे … तूच रे !
जाणीवेच्या अलिकडे… जाणीवेच्या पलिकडे
आणि दोन्ही मधल्या
जाणवत्या जाणीवेत…
तूच रे… तूच रे !
आधी… मधी… आत्ता… नंतर
आधीच्या आधी आणि मधीच्या नंतर
तूच रे… तूच रे तो ‘कायम’ !
तूच रे… तूच रे तो ‘अथांग’ !
तूच रे… तूच रे तो ‘अनंत’ !
जय गुरु
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
२५ जून २०१२
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.